आजच्या या संगणक युगात विज्ञानाने खूप प्रगती केलेली आहे. सर्वांचे जीवनमान सुखकर होत चालले आहे. त्याचबरोबर आजारांची विविध स्वरूपांमध्ये वाढ झपाट्याने होत आहे. विविध मार्गाने आजार समोर येत आहे. मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग यासारख्या आजारांचे स्वरूप म्हणजे जणू या आजारांची साथ सुरू आहे की काय यांची शंका येते. या आजारांचे मूळ हे सुखवस्तु जीवन व आहार विहारावर नियंत्रण नसणे ही प्रमुख कारणे आहेत. अशा स्वरूपांच्या आजारांसाठी तात्पुरते उपचार न करता त्याच्या कारणांवर म्हणजे मूलगामी चिकित्सा हेच उत्तर आहे. यासाठी आयुष्याचे ज्ञान सांगणारी आयुर्वेद ही एकमेव चिकित्सा प्रणाली आहे. ज्यामध्ये हितकर काय आहे, अहितकर काय आहे याचे विस्तृत वर्णन केलेले आहे. त्यानुसार उपचार केल्यास अशा प्रकारच्या आजारांपासून नक्कीच सुटका मिळेल हे नक्की.
आजारांवर उपचारासाठी आजच्या युगामध्ये अनेक चिकित्सा प्रणाली आल्या आहेत. जसे अॅलोपॅथी, होमिओपॅथी, निसर्ग उपचार अशा अनेक चिकित्सा प्रणालींचा उदय झाला. माझ्या माहितीनुसार जगामध्ये एकूण 110 प्रकारच्या चिकित्सा प्रणाली अस्तित्वात आहेत. या चिकित्सा प्रणालींचा इतिहास जेमतेम पाचशे वर्षापर्यंतचा आहे. या सर्व चिकित्सा प्रणालीमध्ये सर्वाधिक चार हजार पेक्षा जास्त वर्षाचा इतिहास असणारे असे आयुर्वेद हे एकमेव शास्त्र आहे. या आयुर्वेदाचे सिद्धांत हे आजतागायत जसेच्या तसे आहेत. त्यामध्ये यतकिंचीत ही फरक पडलेला नाही. आयुर्वेदातील याच सिद्धांताच्या आधारे बहुतांश इतर चिकित्सा प्रणाली आहेत. अॅलोपॅथीमध्ये देखील बहुतांश औषधे ही वनस्पती स्रोतातून मिळवलेली आहेत. आयुर्वेदामध्ये चिकित्सा करताना हेतू (रोगाचे कारण) लक्षण व व्याधीच्या विरोदी चिकित्सा वर्णन केलेली आहे. याचे एकूण 18 प्रकार होतात. त्यातील लक्षण विरूद्ध चिकित्सा करणारी प्रणाली म्हणजे अॅलोपॅथी होय व या 18 प्रकारातील आयुर्वेदातील तदर्थकारी चिकित्सा म्हणजे होमिओपॅथी होय. समजण्यासाठी एक उदाहरण देतो. एखाद्या व्यक्तीस अॅसिडिटी झाल्यास त्याला अल्कली अथवा अॅसिड बंद करणारी चिकित्सा देणारे शास्त्र म्हणजे अॅलोपॅथी थोडक्यात अँटिपथी होय. म्हणजे लक्षणांच्या विरोधी चिकित्सा करणे. अॅसिड कमी करण्यासाठी अल्प मात्रेतच अॅसिडच देणे जेणे ते कमी होईल याला होमिओपॅथी असे म्हणतात. आयुर्वेदामध्ये अॅसिडिटी का वाढलेली आहे हे कारण शोधून अॅसिड तयार होणारी प्रणालीच सुधारण्याचे काम आयुर्वेदामध्ये केले जाते. जोपर्यंत मूळ कारणापर्यंत जाऊन ती प्रणाली सुधारण्याचे काम होत नाही तो पर्यंत तो आजार पूर्ण बरा होऊ शकत नाही. अशा प्रकारच्या चिकित्सेमुळेच आयुर्वेदाने आजार पूर्ण बरा होतो.
मध्यंतरी एका सामाजिक संस्थेने भारतात केलेल्या सर्वेक्षणानुसार साधारणपणे 56 टक्के लोक हे अॅलोपॅथी शिवाय इतर उपचार पद्धतींचा वापर करतात. यामध्ये आयुर्वेद, होमिओपॅथी, निसर्ग उपचार, योग या सर्व पद्धतींचा समावेश होतो. काही लोक घरगुती उपचार करत असतात बहुतांश वेळा हे आयुर्वेद चिकित्सा प्रणालीचा भाग असतो. सर्दी, खोकला झाला अडुळसा घ्या. पोटदुखी ओवा घ्या असे सल्ले ज्येष्ठांकडून दिले जातात. अनाहुतपणे दिले जाणारे हे सल्ले आयुर्वेदाशी संबंधित असतात. हे लोकांना माहित नसले तरी ते वापरले जातात हे नक्की. जनसामान्यांनमध्ये आयुर्वेद म्हणजे काय? या विषयाची माहिती म्हणजे आंधळ्या व्यक्तीचे हत्तीबाबतचे ज्ञान होय. जो अवयव हाती लागेल तसे हत्तीचे वर्णन करतो त्याचप्रमाणे आयुर्वेदाबाबत लोकांचे ज्ञान असते. कोणी याला झाडपाल्याची औषधं तर कोणी याला गावठी औषधं असे संबोधतात. आयुर्वेद हे निसर्गदत्त असे शास्त्र आहे.
आयुर्वेद ही आपली प्राचीनतम चिकित्सा प्रणाली आहे. आयुर्वेद म्हणजे जीवना विषयीचे ज्ञान. हे ज्ञान असणे वा मिळवणे म्हणजेच उत्तम जीवन जगण्याचा मार्ग आहे. आयुर्वेदाचा पायाच शरीर आणि सृष्टीतील साधर्म्याचा विचार यावर आधारलेला आहे. आयुर्वेद चिकित्सेची व्याप्ती खूप मोठी आहे. ‘स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम् आतुरस्य विकार प्रशमनं चऽ म्हणजेच रोग होऊच नये म्हणून शरीराची प्रतिकार क्षमता वाढवणे तसेच एका रोगाचा उपचार करताना नवीन रोग निर्माण होणार नाही याची काळजी घेणे. या उपचार पद्धतीत रोगाचे निदान होणे
जेवढे महत्वाचे त्याहूनही महत्वाचे आहे रोगास कारणीभूत ठरणारे घटक शोधणे. आयुर्वेदात फक्त रोगाचाच विचार न करता रुग्णाच्या शरीराचाही प्रामुख्याने विचार केला जातो. म्हणूनच चिकित्सा ही रोग आणि रुग्ण अशा दोघांची असते. आयुर्वेदाबद्दल लोकांच्या मध्ये बरेच समज गैरसमज असतात. त्याबद्दलचा उहापोह आपण करणार आहोत.
आयुर्वेदाबद्दल जनसामान्यात असलेले समज व गैरसमज
1) गुण येण्यास लागणारा वेळ ः
आयुर्वेद म्हणजे गुण येण्यास वेळ लागणार असा जनसामान्यामध्ये एक समज आहे. काही लोक विनोदाने म्हणतात की मी आता औषध घेतले तर नातवंडांना गुण येईल हा झाला विनोदाचा भाग. कोणतीही उपचार पद्धती असो जर रोगाची मुळे खोलवर पसरलेली नसतील तर रोग लवकर बरा होण्याची शक्यता वाढते. रोगाची पातळी रुग्णाची शारीरिक आणि मानसिक स्थिती, त्याचे वय, बाह्य वातावरण या सगळ्यांवर उपचाराचा कालावधी ठरतो. या सर्वांबरोबरच जर रुग्णाचा सकारात्मक दृष्टीकोन असेल तर अपेक्षेपेक्षा लवकर गुण येतो.
2) पथ्यापथ्य ः
आयुर्वेदाला खूप पथ्य असतात हा एक गैरसमज आहे. वास्तविक आयुर्वेदाला पथ्य नसून आजाराला पथ्य असतात हे लक्षात घेतले पाहिजे. उदा. एका ठिकाणी आग लागली की त्याचा स्रोत प्रथम बंद करून मग ती योग्य प्रकारे विझवली जाते. त्याचप्रमाणे एखादा आजार झाल्यास ते आजार वाढवणार्या गोष्टी बंद केल्यास लवकर गुण मिळतो हे आपण व्यवहारामध्ये अनुभवत आहोत. पथ्यापथ्याचेही तसेच आहे. जर रोगास कारणीभूत ठरणार्या घटकांना बांध घातला तर रोगाची तीव्रता कमी होते. आगीत तेल ओतल्यावर जशी आग भडकते तसेच कुपथ्यांचे प्रमाण वाढले की उपचारांचा वेग मंदावतो.
3) आयुर्वेद औषधांच्या दुष्परिणाबाबत ः
एखाद्या व्यक्तीने जास्त प्रमाणात पाणी किंवा अन्न घेतले तरी त्रास हा नक्की होणारच. ही तर औषधे आहेत याचे जास्त प्रमाणात किंवा अयोग्य अवस्थेत सेवन केले तर त्रास होणारच. आयुर्वेदाने असे सांगितले आहे की एकाच आजारासाठी प्रत्येक व्यक्तीचे औषध वेगळे असते असे असताना सरसकट कोणीही कोणतेही औषध घेतले तर थोडा फार त्रास होऊ शकतो.
आयुर्वेदीय औषध सेवनाचे त्रास हे गंभीर स्वरूपाचे म्हणजे एखादा अवयव निकामी होणे अशा स्वरूपाचे नसतात म्हणून जनसामान्यातून आयुर्वेदिक औषधांना साईड इफेक्ट नसतात असे म्हटले जाते.
आयुर्वेदोक्त रसकल्पांचे दुष्परिणाम बाबत बर्याच वेळा वृतपत्रात छापून येते. विशेषतः परदेशातील लोकांकडून हे आक्षेप घेतले जातात. त्याबाबतचे सत्य असे आहे की आयुर्वेदिय औषधांचे भैषज्यकल्प म्हणजे वनस्पतीजन्य औषधे आणि रसकल्प म्हणजे वनस्पतीजन्य द्रव्यांबरोबरच धातू किंवा प्राणिज पदार्थ वापरून तयार केलेली औषधे असे दोन प्रकार आहेत. बरीचशी आयुर्वेदिक औषधे भैषज्यकल्प असतात. रसकल्पातील औषधे मूळ द्रव्यावर अनेक पद्धतशीर प्रक्रिया करून सिद्ध केल्यामुळे मूळ पदार्थाचे रासायनिक गुणधर्म पूर्णतः बदलतात व ते पदार्थ शरीरसात्म्य म्हणजे एकरूप होतात म्हणजेच त्या औषधातील घातक घटकांचे अस्तित्व नगण्य झाल्यामुळे त्याची विषाक्तता नाहीशी होते. सोने, चांदी, पारा यासारखे धातू हे भस्म करून वापरले जातात. भस्म म्हणजे राख. एखाद्या गोष्टी भस्म झाल्या म्हणजे राख झाल्यास त्याचे मूळ स्वरूप नाहीसे होते. तसेच या धातूचे भस्म म्हणजे त्या धातूचे मूळ स्वरूप नाहीसे झालेले असते त्यामुळे भस्मांना विषक्तता नसते.
4) औषधांची एक्सपायरी डेट ः
आयुर्वेदिय औषधांच्या एक्सापयरी डेट बाबत अनेक गैरसमज आहेत जसे औषधांना एक्सपायरी डेट नसते. वास्तविक वनस्पती चूर्ण ठराविक काळानंतर त्यांचा नक्कीच प्रभाव कमी होतो. भस्म आसव अरीष्ट ही जेवढी जुनी असतात तेवढी जास्त गुणकारी असतात.
5) आयुर्वेद व मांसाहार ः
आयुर्वेदामध्ये मांसाहाराचा निषेध केलेला नाही उलट राजयक्ष्मा सारख्या आजारांमध्ये मांसाहार करण्याचे निर्देश दिले आहे एवढेच नसून एखादी व्यक्ती मांसाहार घेत नसेल तर त्याच्या नकळत मांसाहार द्या असे सांगितलेले आहे. मांसाने वर्धन होते असे वर्णन आहे.
चार हजार वर्षापूर्वी वर्णन केलेले सिद्धांत आज देखील जसेच्या तसे आहेत ते बदलण्याची गरज भासली नाही. त्रिफळा चूर्णाचे गुणधर्म व त्याचे प्रत्यय आजही येतात. म्हणून आयुर्वेद हे शाश्वत आहे. आपल्या भारतीय लोकांना
जगामध्ये अभिमान वाटावा असे हे आपले आयुर्वेद शास्त्र आहे. या शास्त्रात वर्णन केल्याप्रमाणे आपले जीवनक्रम ठेवल्यास आरोग्यदायी आयुष्य नक्कीच उपभोगता येईल यात शंका नाही.
वैद्य विक्रम गायकवाड