गर्भवतीने स्त्रीने आहाराकडे विशेष लक्ष देणे अतिशय गरजेचे असते. आहारापासून जो आहार रस तयार होतो त्यापासून गर्भाचे पोषण आणि वाढ होत असते.
गर्भावस्थेत फोलिक ऐसिड, आर्यन, कैल्शियम आणि यांची सर्वाधिक गरज असते. त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे गोळया सुरू करणे आवश्यक आहे. त्याबरोबरच आहारातही जरूर तो बदल करणे आवश्यक आहे.
- आइरन: गर्भावस्थेत रोज 200 mg एवढी आइरनची मात्रा आवश्यक असते. आहारात यासाठी विशेषतः मेथी, पुदिना, पालक व इतर हिरव्या पालेभाज्या, मूग, उडीद, मसूर, वाटाणा, सोयाबीन, खजूर, आंबा, गूळ, शेंगदाणे यांचा समावेश असावा.
- कैल्शियम: दूध व दूधाचे पदार्थ, कडधान्ये, लोणी, तूप, मेथी, शेवग्याची पाने, बीट, अंजीर, द्राक्षे, कलिंगड, उडीद डाळ इ. पासून कैल्शियम मिळते.काही स्त्रियांचे कल फार कमी असते त्यांनी आठवडयातून चार वेळा पालक सूप किंवा पालकभाजी किंवा पालक सॅलड घ्यावे. बदाम, खारीक, खजूर, जरदाळू रोज खावे. त्याबरोबरच नाचणीसत्त्च, काळे मनुके, फळे, गुळ-शेंगदाणे यांचाही समावेश करावा.
- पाणी: गर्भवतीचे पिण्याचे पाणी उकळून निर्जंतुक केलेेले असावे.
- दूध: रोज सकाळ, संध्याकाळ गर्भवती स्त्रीने एक-एक कप दूध शतावरी कल्प घालून प्यावे. दूधापासून कैल्शियम भरपूर प्रमाणात मिळून त्यामुळे गर्भारपणात व बाळंतपणानंतर सांधेदुखी, कंबरदुखीचा त्रास सहसा होत नाही. त्याचबरोबर बाळाची शारीरिक व बौद्धिक वाढ व्यवस्थित होण्यासाठी दूध महत्वाचे ठरते. शतावरी कल्पामुळे गर्भवतीचे व बाळाचे पोषण तर होतेच पण त्याचबरोबर स्त्रीचा बांधा उत्तम ठेवण्याची क्षमता शतावरीमध्ये असल्याने गरोदरपणात आणि बाळंतपणानंतरही स्त्रीचे वजन अवाजवी वाढत नाही.
- लोणी: गर्भारपणात सुरूवातीपासूनच एक-दोन चमचे लोणी खडीसाखरेबरोबर घेतल्यास मूळव्याधीचा त्रास होत नाही.
- ताक: रोज दुपारच्या जेवणानंतर गोड ताक घ्यावे. त्यामुळे पचन व्यवस्थित होते. त्याचबरोबर अंगावर सूज येत असल्यास ती कमी होते.
- तूप: गर्भारपणात स्त्रीने सकाळ आणि संध्याकाळच्या जेवणात 3-4 चमचे तूप अवश्य सेवन करावे. यामुळे बुद्धि, स्मरणशक्ती व आकलनशक्ती वाढते.
- विटामिन बी : हिरव्या पालेभाज्या आठवडयातून 3 वेळा घ्याव्या.
- विटामिन सी : रोज अर्धेलिंबू किंवा एक आवळा खावा.
- विटामिन डी : दूध व दूधाचे पदार्थ घ्यावे. त्याचबरोबर रोज सकाळी 10-15 मिनिटे कोवळया उन्हात बसावे.
- विटामिन ई : गव्हांकुर आठवडयातून 3 वेळा घ्यावा.
- विटामिन ए : गाजर, टोमॅटो, बीट, लाल भोपळा, आंबा ह्यापैकी दोन पदार्थ रोज खावे.
- Fermented food: इडली, डोसा, ढोकळा यापैकी एक पदार्थ आठवडयातून दोन वेळा घ्यावा.
- फळे: गर्भारपणात रोज एक ताजे फळ खाणे आवश्यक आहे. सफरचंद, द्राक्षे, डाळिंब, गोड संत्रे, मोसंबी, अंजीर, आवळा इ., गोड संत्र्या मोसंबीचा पाणी न घालता घरी काढलेला अर्धा ग्लास रस गर्भवतीने नियमित घेणे चांगले.
- शहाळयाचे ताजे पाणी गर्भारपणात नियमित घ्यावे. गर्भोदकाचे प्रमाण योग्य राहण्यास मदत होते.
- रोज 3-4 बदाम पाण्यात भिजवून एक खारीक, दोन खजूर व अंजीर खावे.
- सकाळ व संध्याकाळच्या जेवणात एक वाटी तरी डाळीचे वरण/आमटी असावी. एका वेळेला मोड आलेल्या कडधान्यांची उसळ असावी.
गर्भारपणात काय खाऊ नये:
- दिवस राहिल्यानंतर कोणत्याही रूपात कोरफड आणि पपई खाऊ नये.
- चीज, पनीर वगैरे पचायला अतिशय जड असतात त्यामुळे शक्यतो खाण्याचे टाळावे.
- बिस्किटे, नुडल्स, केक, पाणीपुरी, भेळपुरी वगैरे टाळलेलेच बरे.
- सोडा व इतर शीतपेये टाळावी. त्याऐवजी लिंबू सरबत घ्यावे.
- खाद्यपदार्थात कृत्रिम रंग मिसळल्यास गॅसेस वगैरे पचनाचे त्रास होतात.
- अंडी व मांसाहार टाळावा.
डॉ. श्वेता सचिन गोसावी
बी.ए.एम.एस.
गर्भसंस्कार कंन्स्लटंट