आजच्या या आरामदायी पण प्रचंड धावपळीच्या युगामध्ये आपण आपल्या पाठीच्या कण्याकडे लक्ष देेणे फार जरूरीचे झाले आहे. कोणत्याही वाहनाच्या चाकाचा कणा जर नाजुक असेल तर इतर अंगाने मजबुत असणार्या त्या वाहनाचा काहीच उपयोग नाही. तेव्हा कणा मजबुत असेल तर आपण आली धावपळ सहज पेलु शकु. अन्यथा आपल्याला धावनळ तर लांबच पण आपले स्वतःचे वजनही पेलवने कठीण होऊन बसते.
मणक्याचे मुख्य आजार
मणक्याची झीज (Degenerative changes)
बर्याचदा आपल्या हाडांमधील कॅल्शियम कमी झाल्याने पाठीच्या मणक्याची झीज होते, कधी ती मानेमध्ये जास्त असते त्यामुळे सर्वाइकल स्पॉन्डिलिसिस होण्याची शक्यता असते तर कधी ती झीज कमरेच्या मणक्यामध्ये जास्त असते त्यामुळे लम्बर स्पॉन्डिलिसिस होण्याची शक्यता असते.
लक्षणे
- मान दुखणे.
- पाठ दुखणे.
- चक्कर येणे.
- हाताला किंवा पायाला मुंग्या येणे.
पाठीची चकती खाली सरकणे (Intervertebral Disc Prolapse) :
सतत वाहन प्रवास, दिवसभर खुर्चीमध्ये (चुकीच्या पोजिशनमध्ये) बसून काम करणे, जड हेल्मेटचा वापर, वाकुन काम करणे, सतत जड उचलणे इत्यादी कारणांमुळे दोन मणक्यांमधील गादी बाहेरच्या बाजूला सरकते व त्या मणक्यांमधून बाहेर पडणार्या मज्जातंतू वरती तिचा दाब पडतो, त्यामुळे तो मज्जातंतू ज्या भागाला पुरविला जातो त्या भागात वेदना अथवा मुंग्या येतात.
लक्षणे
- हातामधील किंवा पायामधील ताकत कमी होणे.
- हात किंवा पाय जड होणे.
- हाता पायाला मुंग्या येणे.
- कमरेतुन पाय अवघडणे.
पाठीचे स्नायु जखडणे (Muscle spasm):
यामध्ये पाठीचे स्नायु पिळवटले जातात, बर्याचदा चुकीच्या पद्धतीने व्यायाम अथवा आहारमधून कमी प्रमाणात प्रोटीन, ताकत नसताना भरपूर काम करणे, सततचे रात्रीचे जागरण यामुळे आपले स्नायु रूक्ष व नाजुक होतात. त्यामुळे ते जखडून मसल स्पैज़म होते.
लक्षणे
- पाठ अवघडणे.
- पाठ दुखणे.
आघातजन्य व्याधी (Accidental Injury):
कोणतातरी अपघात अथवा पाठीवरती जोराचा आघात यामुळे पाठीच्या मणक्यास मोठा आघात (spine injury) होतो. यामुळे बर्याचदा रुग्णास अंथरूणामध्ये झोपूनच रहावे लागते, जास्त वेळ बसून राहिले तरी चक्कर येते व पुन्हा झोपूनच रहावे लागते. यामध्ये मूत्र विसर्जन व मल विसर्जनावरही बर्याचदा नियंत्रण रहात नाही, दोन्ही पायांना कोणतीच संवेदना राहिलेली नसते, त्यामुळे रुग्णांना ऐन उमेदीच्या काळात झोपून रहावे लागते. परंतु आयुर्वेदामध्ये याकरीता बरेच चांगले उपचार आहेत.
मणक्याची काळजी कशी घ्याल?
- रोज रात्री झोपताना मणक्याला तीळाचे तेल कोम करून लावावे.
- नाकामध्ये देशी गाईचे तुप कोमट करून सोडावे.
- सुंठीचा लेप कोमट पाण्यातुन लावावा.
- नाचणी सत्वची खीर सकाळी खावी.
- रोज रात्री 1 ओले खोबरे चावून खावे.
पाठीच्या मणक्याकरीता योगासने
संतुबंधासन, शलभासन, धनुरासन, उष्ट्रासन, माज्रासन, भुजंगासन, ताडासन, अर्धमत्स्येन्द्रासन, मत्स्यासन, जानुचलन.
डॉ. विद्याधर कुंभार, च.ऊ.