होमिओपॅथीने किडनी विकारांवर मात

किडनी म्हणजेच मूत्रपिंड, हा आपल्या शरीरातील एक अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. आपला जन्म झाल्यापासून अखंड, अविरतपणे त्यांचं काम सुरू असतं. भूक लागली की आपल्याला समजतं; पण युरिन शरीराकडून आपोआप तयार होत असतं. किडनीचं काम नीट सुरू असेपर्यंत शरीराची गाडी रुळावर असते. पण एकदा का किडनीचे गुंतागुंतीचे विकार डोकं बाहेर काढायला लागले, की गंभीर परिस्थितीही उद्भवू शकते. किडनीच्या विकाराचे वेळेवर निदान आणि योग्य औषधोपचार यांमुळे अशी गंभीर परिस्थिती आपण टाळू शकतो. किडनीच्या विकारांवरील उपचारांमध्ये होमिओपॅथीचा वाटाही मोलाचा आहे. जाणून घेऊयात किडनी विकार आणि त्यावरील होमिओपॅथीमधील उपचार यांविषयी तज्ज्ञ डॉ. इंद्रनील बावडेकर यांच्याकडून.

प्रश्न : किडनीचे साधारण कोणकोणते विकार असतात?

उत्तर :

 मूत्रपिंड म्हणजेच किडनी हा अवयव आकारानं छोटा असला तरी आतून मोठा असतो. किडनीच्या विकारांची विभागणी तीन वयोगटांनुसार करता येते. लहान मुलांना होणार्‍या किडनीच्या विकाराला नेफ्रोटिक सिंड्रोम म्हणतात. यामध्ये मुलांना किरकोळ ताप येतो, त्यांचा घसा दुखतो आणि त्यानंतर त्यांच्या किडनीवर परिणाम होतो. किरकोळ तापाची औषधं घेतल्यावर ताप उतरतो; पण हळूहळू किडनीमधून प्रोटीन, लालरक्त पेशी, विषाणू बाहेर पडतात. 10 टक्के मुलांना हळूहऴू अंगावर सूज यायला लागते, लघवी कमी व्हायला लागते. मग तज्ज्ञ डॉक्टरकडे नेल्यावर त्यांना साधा ताप नाही, तर नेफ्रोटिक सिंड्रोम झाल्याचं लक्षात येतं. काही मुलांची किडनी जन्मत:च लहान असते.

मध्यम वयोगटातील लोकांमध्ये म्हणजे साधारण 17,18 वयापासून 40 ते 45 वयाच्या लोकांमध्ये ज्यांना वारंवार मुतखडे होतात, त्यांच्यामध्ये किडनीला इजा होण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे किडनीमध्ये संसर्ग होऊ शकतो. तारुण्यपिटीकांप्रमाणे काही लोकांना मध्यमवयात किडनीमध्ये सिस्ट (गाठी) निर्माण व्हायची प्रवृत्ती असते. त्यामुळेसुद्धा किडनीचे विकार उद्भवतात.
त्यानंतरचा वयोगट हा सर्वांत महत्त्वाचा. 80 टक्के लोकांना चाळीशीनंतर मधुमेह आणि रक्तदाब यांसारखे विकार मागे लागतात. हे विकार नियंत्रणात नसणं, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं आणि योग्य उपचार न घेणं या सगळ्याचा परिणाम किडनीवर होतो.

प्रश्न :या सगळ्या वयोगटातल्या किडनीच्या विकारांचं आता लोकसंख्येमध्ये प्रमाण किती आहे?

उत्तर :

दहा वर्षापर्यंतच्या लहान मुलांमध्ये 5 ते 10 टक्के नेफ्रोटिक सिंड्रोम आजार आढळतो. 30 ते 40 टक्के मध्यमवयीन रुग्णांमध्ये किडनीस्टोन आढळतो. उतारवयात, 45 नंतर ज्यांना मधुमेह, रक्तदाब आहे अशा लोकांमध्ये जवळजवळ 60 टक्क्यांपर्यंत लोकांमध्ये किडनीचे विकार आढळतात. त्याचं प्रमाण खूप आहे.

प्रश्न :किडनीच्या विकाराची लक्षणं कोणती?

उत्तर : 

आमच्याकडे औषधोपचारासाठी येणार्‍या कित्येक रुग्णांना आपल्याला किडनीचा विकार आहे हेच मूळात माहिती नसतं. सर्वसाधारणपणे अंगावरती सूज येणं, लघवी कमी होणं, लघवीला जळजळ होणं या गोष्टी व्हायला लागल्या, की किडनीच्या विकाराचे निदान होते. मध्यमवयात अनेक स्त्रियांमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असते. माझं हिमोग्लोबीन नेहमीच कमी असतं, अशी अनेक स्त्रिया स्वत:ची समजूत घालत असतात. पण असं करणं योग्य नाही. किडनीविकारामुळेदेखील हिमोग्लोबीन कमी होतं. अंगात कमी रक्त राहणं हेही किडनीच्या विकाराचं लक्षण आहे. त्यामुळे मासिक पाळी नियमीत आहे, पण अंगात रक्त कमी होत असेल तर सर्वप्रथम आपल्याला किडनीचा विकार आहे का, हे मध्यम वयात तपासलं पाहिजे. अंगात रक्त कमी राहणं, दमल्यासारखं, थकल्यासारखं होणं, सकाळी उठल्या उठल्या चेहरा फुलल्यासारखा वाटणं, दिवसभरात आपोआप ती सूज कमी होणं आणि जोडीला हातापायाला सूज, कमी लघवी, धाप लागणं ही सगळी या आजाराची सुरुवातीची लक्षणं आहेत.

कधी कधी फारशी काही लक्षणं दिसत नाहीत. उतारवयात बर्‍याचदा फक्त मधुमेह, रक्तदाब यांच्या तपासण्या केल्या जातात. ती आकडेवारी समाधानकारक असेल, तर आपली तब्बेत छान असा अनेकांचा समज असतो. पण वर्षातून एकदा संपूर्ण शरीराची तपासणी करून घेणं खूप गरजेचं असतं. त्यातून मग रक्तामधील युरियाचं, क्रियॅटिनीन, लघवीमधील प्रोटीन्स आणि किडनीचा आकार (सोनोग्राफी) या सगळ्या गोष्टी समजू शकतात.

प्रश्न : किडनीचा आजार ओळखण्यासाठी कोणत्या तपासण्या असतात?

उत्तर : 

पोटाचा एक्स-रे, सोनोग्राफी आणि त्याहीपुढे जाऊन डॉक्टरी सल्ल्यानं स्कॅनिंगच्या चाचण्यांमधून किडनीला सूज आली आहे का, किडनीचं काम नीट होत नाहीय का, याची तपासणी करता येऊ शकते.

प्रश्न : होमिओपॅथीचा किडनीच्या विकारांत कसा उपयोग होतो?

उत्तर : 

किडनीच्या विकारांवरील उपचारांमध्ये होमिओपॅथी खूप मोलाचे काम करू शकते. किडनी विकारांवर उत्तम काम करणारी 300-400 औषधं होमिओपॅथीमध्ये आहेत. पण किडनीचा विकार खूपच बळावलेला असतांना शेवटचा उपाय म्हणून होमिओपॅथीकडे वळण्यात काहीच अर्थ नसतो. त्यामुळे किडनीच्या आजाराचं निदान वेळेवर झालं आणि सुरुवातीपासून होमिओपॅथीची औषधं घेतली, तर त्याचा खूपच चांगला उपयोग होऊ शकतो.

आधुनिक औषध पद्धतींमध्ये डायलिसिस आणि किडनी ट्रान्सप्लान्ट (मूत्रपिंड रोपण) एवढ्या दोनच गोष्टी उपलब्ध आहेत. डायलिसिसची वेळ येऊन ठेपल्यानंतर रुग्ण होमिओपॅथीच्या डॉक्टरकडे आला, तर तेव्हा खूप उशीर झालेला असतो. आजाराच्या सुरुवातीपासून होमिओपॅथीचे योग्य औषधोपचार दिले, तर त्या रुग्णाला डायलिसीसपर्यंत पोहोचावेच लागत नाही.

लहान वयातील मुलांना होणार्‍या नेफ्रोटिक सिंड्रोमसाठी आधुनिक औषध पद्धतीत केवळ स्टीरॉइड आहे. पण होमिओपॅथीमध्ये विविध औषधं आहेत. मध्यमवयीन लोकांना वरचेवर होणार्‍या किडनीस्टोन्स वा सिस्टमुळे किडनी खराब होते. या रुग्णांमध्ये असे स्टोन्स वरचेवर होणं ही शरीराची प्रवृत्ती बनते. होमिओपॅथीच्या औषधांमुळे शरीराची ही प्रवृत्ती (बॉडी टेंडन्सी) थांबू शकते. किडनीमध्ये येणारे सिस्ट हळूहळू कमी करून पूर्ण काढून टाकण्याची क्षमता होमिओपॅथीच्या औषधांमध्ये खूप चांगली आहे. त्यामुळे किडनीचा विकार पूर्ण थांबू शकतो. उतारवयात मधुमेह, रक्तदाब हे आजार होऊन बराच काळ लोटलेला असतो. त्यासाठी सातत्याने घेतलेल्या औषधांचा परिणाम किडनीवर होण्याची दाट शक्यता असते. अशा वेळी आजाराचे निदान करून योग्य होमिओपॅथी तज्ज्ञांकडून, डॉक्टरांकडून औषध उपचार केल्यास किडनीचे पुढील सर्व विकार हे भविष्यात वाचवू शकता.

डायलिसिसवर असलेल्या रुग्णांचा एक नेहमी प्रश्न असतो, की डॉक्टर होमिओपॅथीचा काही उपयोग होईल का? इतक्या उशीरा आलेल्या रुग्णांचं डायलिसीस पूर्ण बंद होण्याची खात्री आम्ही देऊ शकत नाही. किडनीचा आकार कसा झाला आहे, ती पूर्ण आक्रसली आहे का, दोन्ही किडन्यांचं काम नीट होत नाहीय का, असे विविध प्रश्न त्यात सामावलेले असतात. पण अशा वेळीही होमिओपॅथीची औषधं पूरक ठरतात. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे इतर औषधपद्धती सुरू असतानासुध्दा रुग्ण होमिओपॅथीची औषधं घेऊ शकतो. त्या औषधांचे बाकीचे दुष्परिणाम (साईड इफेक्ट्स) नसतात.

किडनीचे विकार गुंतागुंतीचे असतात. या विकारांमुळे गंभीर परिस्थिती उद्भवू नये, यासाठी वेळीच उपाययोजना करावी लागते. यासाठी तज्ज्ञ, अनुभवी होमिओपॅथीच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

डॉ. इंद्रनील बावडेकर
M.D.(Hom), LL.B.
icbawadekar@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You might like also

स्वास्थ्य हेतु लाजवाब मनभावन शरबत

मुनक्कों का शरबत सामग्री ः  15-20 मुनक्का, 1 नींबू, आधा चम्मच शहद, तीन गिलास पानी। विधि ः मुनक्कों को रातभर पानी में भिगोकर रख दें। फिर उनके

स्वास्थ्यवर्धक पेय

छाछ नियमित रूप से छाछ का सेवन करनेवाला व्यक्ति रोग-व्याधियों से मुक्त रहता है। इतना ही नहीं, छाछ सेवन के कारण ठीक हुई व्याधि पुनः